घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत ‘हॉर्नबिल देवराई’ उपक्रमाचा शुभारंभ; ‘हॉर्नबिल क्लब’चीही स्थापना

 लवेल, चिपळूण : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि तरुण पिढीत निसर्गाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) येथे १४ जुलै २०२६ रोजी ‘हॉर्नबिल देवराई’ या अभिनव उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात ‘हॉर्नबिल क्लब’चीही अधिकृत स्थापना करण्यात आली.

सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख आणि चिपळूण वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व तांत्रिक सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. उद्घाटनप्रसंगी चिपळूण वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी (डीएफओ) गिरीजा देसाई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात हॉर्नबिल (धनेश) पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या विविध स्थानिक वृक्षप्रजातींच्या लागवडीने झाली. त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी डॉ. नितीन कोळेकर यांनी प्रास्ताविक करून उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील यांनी संस्थेच्या शाश्वत विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. सह्याद्री संकल्प सोसायटीचे संचालक प्रतीक मोरे यांनी सादरीकरणाद्वारे नव्याने स्थापन झालेल्या ‘हॉर्नबिल क्लब’च्या माध्यमातून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

प्रमुख पाहुण्या गिरीजा देसाई यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक संस्थांनी देवराई उभारणीसाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांना वनविभागाचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी देवराईचे संवर्धन व देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी संयुक्तपणे पार पाडतील, असा निर्धार व्यक्त केला.

महाविद्यालयाच्या सीईएस विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रतीक ओक यांनी प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या उपक्रमामुळे महाविद्यालयीन परिसरात जैवविविधतेचे संवर्धन, धनेश पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास निर्मिती आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

SOURCE LINK OFFICIAL FB

Post a Comment

Previous Post Next Post